मराठी वाङमय आणि भाषा यांवर संशोधन व्हावं या उद्देशानं 1 फेब्रुवारी 1948 रोजी मुंबई मराठी संशोधन मंडळ या संस्थेची स्थापना झाली. नावाप्रमाणं संस्थेनं अगदी सुरूवातीपासूनच मराठी वाङमयीन संशोधनात स्वत:ला वाहून घेतलं. प्रारंभीच्या काळात भारतरत्न पां. वा. काणे, प्रा. कृ. पां. कुळकर्णी, प्रा. अ. का. प्रियोळकर, बाळासाहेब खेर अशी दिग्गज मंडळी संस्थेच्या कार्यकारणीत होती. पुढे मंडळाने 1953 मध्ये ‘मराठी संशोधन पत्रिका’देखील सुरू केली. गेली 74 वर्षे जुन्या मराठी वाङमयाचं संशोधन, संपादन, प्रकाशन करण्याचं काम मंडळ अव्याहतपणे करत आहे. इतकंच नव्हे तर, मराठी भाषा, व्याकरण, बोली, लिपी यांचा अभ्यास करणं, मराठी वाङमयाचा कोश आणि संशोधन-साधनं निर्माण करणं, संशोधकांना मार्गदर्शन करणं, संशोधक तयार करणं, दुर्मिळ हस्तलिखितं मिळवणं या उद्दिष्टांसाठीदेखील मंडळ झटत आहे.
मंडळानं वाङमयीन इतिहासाच्यादृष्टीनं अनेकविध थक्क करणारे प्रकल्प पूर्ण केले आहेत. जसे, चार खंडात प्रकाशित असलेली ‘मुक्तेश्वरांच्या महाभारताची (आदिपर्व) चिकित्सक आवृत्ती’ असेल किंवा भारतात मुद्रण प्रवेशास 1956 मध्ये 400 वर्षे झाली म्हणून 1958 मध्ये मुद्रणकलेच्या 400 वर्षांच्या वाङमयीन, भाषिक आणि सांस्कृतिक इतिहास असेल; 16व्या -17व्या शतकातील मराठी व कोंकणी बोलीतील दुर्मिळ पुस्तकांचं संशोधन, संपादन, लिप्यंतर असेल याशिवाय दोलामुद्रितांचा शोध, मराठी ग्रंथालयांचा शोध, मराठीतील जुनी व्याकरणे, बोलींचे नमुने, छोट्या मोठ्या जुन्या काव्याच्या संहिता, ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीचं हस्तलिखित, शेतकऱ्यांचा आसूडचं हस्तलिखित मिळवणं, लोकहितवादींचं गुजरातीतील लेखन, इत्यादी. शिवाय ‘ज्ञानेश्वरीचे शब्दभांडार’ हा कोश किंवा इतर कोश मंडळाने निर्माण केले आहेत. जगभर किंवा किमान भारतभर विखुरलेल्या हस्तलिखितांची बृहत्नामावलीही मंडळाने तयार केली आहे.
अशा तऱ्हेनं वाङमयीनदृष्ट्या मोलाचं काम करणाऱ्या मंडळाने 1 फेब्रुवारी 2022 रोजी पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण केलं आहे. यानिमित्तानं स्नेहभेट व संवाद असा एक अनौपचारिक कार्यक्रम साधना साप्ताहिकाच्या कार्यालयात आयोजित केला होता. यावेळी 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, मराठी संशोधन मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत भोंजाळ, संचालक प्रदीप कर्णिक, इतिहासाचे अभ्यासक आणि नवभारत मासिकाचे संपादक राजा दीक्षित, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित होते.
संवादाला सुरवात करण्याआधी, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भारत सासणे यांचा राजा दीक्षित यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पंचाहत्तरीनिमित्त मंडळ डिजिटलाईजही होत आहे. यावेळी सासणे यांच्या हस्ते मंडळाच्या marathisanshodhanmandal.com या वेबसाईटचं प्रकाशन झालं. शिवाय ‘मराठी संशोधन पत्रिके’च्या अमृतमहोत्सवी विशेषांकाचंही प्रकाशन करण्यात आलं.
‘मोठी परंपरा असलेल्या या संस्थेला किती तरी दिग्गज लोकांचा सहवास लाभला आहे. अशा संस्थांचं योगदान मोठं असतं. त्या टिकल्या पाहिजेत.’ अशा भावना व्यक्त करत सासणे यांनी मंडळाच्या पंचाहत्तरीतल्या पदार्पणासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. पुढे ते म्हणाले, “मुळात साहित्यांतर्गत संशोधनाचा विभाग ही अभ्यासशाखा म्हणून विकसित व्हायला हवी. 1960-70च्या कालखंडातल्या लेखनाचा तुलनात्मक अभ्यास होणं महत्त्वाचं वाटतं. मराठी कादंबरीची पायाभरणी करणाऱ्या या मोठ्या मंडळींचं, प्राचीन लेखकांचं तर आपण ॠणी राहायला हवं. मात्र त्यांच्याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नसते. त्याच मांदियाळीत बसणाऱ्या गो. ना. दातार, नाथमाधव यांसारख्या लेखकांची हस्तलिखितं मिळवण्यासाठी मराठी संशोधन मंडळाने प्रयत्न करायला हवेत. याशिवाय आपल्याकडे कोणकोणत्या लेखकांची हस्तलिखितं आहेत? कोणतं साहित्य उपलब्ध आहे? हेही तपासलं पाहिजे.” उदगीर येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनात मराठी संशोधन मंडळाने स्टॉल लावावा जेणेकरून महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या मराठी-कानडी लोकांनाही मंडळाच्या संशोधनकार्याची माहिती होऊ शकेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘सासणे यांचा सत्कार करणं हा मला माझा सत्कारच वाटत आहे,’ अशी प्रांजळ भावना राजा दीक्षित यांनी व्यक्त केली. पुढं ते म्हणाले, मी इतिहासाचा अभ्यासक असल्यानं मराठी संशोधन पत्रिकेच्या अमृतमहोत्सवी विशेषांकाचं ऐतिहासिक महत्त्व जाणतो. महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीत या अंकांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदाच्या वर्षी नवभारत मासिकाला पंचाहत्तर वर्षं पूर्ण झाली, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला 125 वर्षं पूर्ण होत आहेत. तसेच मुंबई मराठी संशोधन मंडळाची पंचाहत्तरी सुरू झाली आहे. येत्या ऑगस्टमध्ये साधना साप्ताहिकाची पंचाहत्तरी सुरू होणार आहे. असे योग दुर्मिळ असतात. त्यामुळं अशा प्रसंगी जे ‘अमृत’तत्व उफाळून येतं- ते संचित जपलं पाहिजे. यावेळी दीक्षित यांनी एक खंतही व्यक्त केली. ‘महाराष्ट्रात लाख रूपये पगार असणारे कितीतरी मराठीचे प्राध्यापक असतील, मात्र त्यांना साधी पाचशे रूपयांची वर्गणी भरून नियतकालिकं वाचता आणि टिकवता येत नाही. या सांस्कृतिक दारिद्र्याची विलक्षण खंत वाटते. अशा संस्था तोट्यात चालत असल्या तरी त्या केवळ चांगल्या माणसांच्या बळावर चालतात. त्यामुळंच जेव्हा-केव्हा मराठीच्या सांस्कृतिक इतिहासाचं पुनर्लेखन होईल तेव्हा मंडळाला जो न्याय मिळायला हवा तो नक्कीच मिळेल, अशी आशा आहे. शिवाय संशोधनासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात. एकेक संदर्भ मिळवण्यासाठी त्रास सोसावा लागतो. मात्र आता मंडळाची वेबसाईट झाल्यामुळं सारं काही वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. त्यामुळं संशोधकांची मोठीच सोय होणार आहे. शिवाय संशोधनाभोवती विनाकारण असणारं वलयही निघून जाईल.’ असंही ते म्हणाले.
यावेळी मराठी संशोधन मंडळाचे संचालक प्रदीप कर्णिक यांनी संस्थेच्या कार्याचा धावता आढावा घेतला आणि विविध प्रकल्पांविषयीची थोडक्यात माहिती सांगितली. ते म्हणाले, ‘जुन्या पुस्तकांचं उत्तम पद्धतीनं संपादन करण्यासाठी तरूण संशोधकांची मंडळाला गरज आहे. शिवाय आपल्याकडं बऱ्याच जुन्या-नव्या पुस्तकांचे तुलनात्मक अभ्यासही खूपच कमी आहेत. तुलनात्मक अभ्यास वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी मंडळ विचार करत आहे.’ याच गोष्टीला दुजोरा देत भोंजाळ यांनीही मराठीतल्या जुन्या-जाणत्या लेखकांची हस्तलिखितं मिळवण्यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे अशी माहिती दिली. आगामी काळात लोकहितवादींनी गुजरातीत लिहिलेलं साहित्य, त्यांच्यावर गुजरातीमध्ये झालेलं लेखन मिळवून आपण प्रकाशित करणार आहोत. तसंच बंगालीतून लेखन करणाऱ्या देऊसकरांचं लेखन मिळवण्यासाठी कलकत्ता ग्रंथालयाशी बोलणं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. विविध स्तरावर अशा स्वरूपाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आर्थिक, प्रशासकीय आणि अलिकडच्या काळातली कोरोनाची अडचण पाहता, त्यात काही अडथळे येत आहेत. मात्र लवकरच आपण त्यावरही मात करू’ अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आभार मानताना साधनेचे संपादक विनोद शिरसाठ म्हणाले, ‘विविध स्वरूपाचा दस्तऐवज आपण रोजच्या रोज गमावत असतो. अनेक मोठ्या संस्था किंवा अगदी संशोधक, संग्राहक, अभ्यासक असणाऱ्या व्यक्तीही बऱ्याचदा लहान-मोठे तपशील ठेवण्यात, फोटोग्राफ्स जतन करण्यात, लेखनाचं डॉक्युमेंटेशन करण्यात कमी पडतात. इथून पुढं तसं होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अलिकडच्या काळात अशा डॉक्युमेंटेशनसाठीची अनुकूलता अधिक आहे. त्यादृष्टीनं संस्थांना चालना द्यायला हवी. गुणवत्तेच्या दृष्टीनं, बांधिलकी म्हणून काम करणारी मंडळी लाभली म्हणून मराठी संशोधन मंडळासारख्या संस्था टिकून आहेत. मंडळाने शंभरी गाठायची असेल तर अशाच कर्तबगार माणसांची फळी लाभायला हवी.’
– हिनाकौसर खान
[email protected]
मराठी संशोधन मंडळाची सर्व पुस्तके साधना मीडिया सेंटरमध्ये उपलब्ध आहेत.
संपर्क :
साधना मिडिया सेंटर
431, शनिवार पेठ, पुणे 411030
[email protected]
Ph. 02024459635,
Mob. 7058286753