विख्यात साहित्यिकांच्या हस्ताक्षर जतनाकडे दुर्लक्ष का?

भारत सासणे

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संचलित अमृतमहोत्सवी मराठी संशोधन मंडळाच्या मराठी संशोधन पत्रिकेचे पुण्यात प्रकाशन

इंग्लडमध्ये नाटककार शेक्सपिअरच्या हस्ताक्षराचे जतन होऊ शकते तर मग गो. ना. दातार, नाथमाधव अशा विख्यात कादंबरीकारांचे, त्यांच्या कालखंडातील इतर साहित्यिकांचे हस्ताक्षर महाराष्ट्रात जतन का होऊ शकत नाही, स्वामित्व कायद्याकडे दुर्लक्ष का होते, आधुनिक साहित्यावर संशोधनात्मक काम का होत नाही, असे प्रश्न उदगीर येथे होत असलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांनी आज उपस्थित केले.
शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे (125) वाटचाल करणार्‍या आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असणार्‍या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मराठी संशोधन मंडळाने आज (दि. 1 फेब्रुवारी 2022) 75व्या वर्षात पदार्पण केले. मंडळाच्या अमृतमहोत्सवानिमित्त मराठी संशोधन पत्रिकेच्या विशेषांकाचे प्रकाशन भारत सासणे यांच्या हस्ते साधना साप्ताहिकाच्या कार्यालयात झाले. त्या वेळी ते बोलत होते. इतिहास अभ्यासक व राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित, मुंबई मराठी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप कर्णिक, मराठी संशोधन मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ अनुवादक चंद्रकांत भोंजाळ, साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठी संशोधन मंडळाच्या वेबसाईटचे प्रकाशन डॉ. दीक्षित यांच्या हस्ते झाले.

उदगीर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भारत सासणे यांचा डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते तर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. राजा दीक्षित यांचा भारत सासणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आणि मराठी संशोधन मंडळाला मोठी परंपरा असून दोन्ही संस्थांनी मराठी भाषा आणि समाजासाठी मोठे योगदान दिले आहे, असे नमूद करून सासणे म्हणाले, या संस्थांसाठी दिग्गज व्यक्तींनी काम केले असून त्यांचे कार्य टिकले पाहिजे, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने उपकारक घटना असेल, समाज अशा संस्थांचा ऋणी राहिल. संस्थेद्वारे होत असलेल्या संशोधनात्मक कार्याचे कौतुक करून त्यांनी दोन्ही संस्थांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. साहिस्य संमेलनाच्या निमित्ताने या संस्थांचे अनमोल कार्य देशभरात पोहोचावे अशी अपेक्षा सासणे यांनी या वेळी व्यक्त केली.
संमेलनाच्या अध्यक्षपदी योग्य व्यक्तीची निवड झाली आहे असे सूचित करून डॉ. राजा दीक्षित म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, संस्थेची अमृतमहोत्सवी पत्रिका आणि साधना साप्ताहिकाचे ऑगस्टमध्ये अमृतमहोत्सवात होणारे पदार्पण असा दुर्मिळ योग जुळून आला असून या निमित्ताने अमृततत्त्व आपल्यासमोर उफाळून आले आहे. इतिहासाचे पुर्नलेखन ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. इतिहास जेव्हा पुन्हा लिहिला जाईल त्यावेळी दोन्ही संस्थांच्या योगदानाला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुरुवातीस डॉ. प्रदीप कर्णिक यांनी दोन्ही संस्थांच्या कार्याचा आढावा सादर केला. दुर्मिळ साहित्य, हस्तलिखिते मिळविण्यासाठी अनेकांचे योगदान लाभले असे चंद्रकांत भोंजाळ यांनी सांगितले. विनोद शिरसाट यांनी आभार मानले.
फोटो ओळ : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मराठी संशोधन मंडळाने आज (दि. 1 फेब्रुवारी 2022) 75व्या वर्षात पदार्पण केले असून त्यानिमित्त मंडळाच्या मराठी संशोधन पत्रिकेचे भारत सासणे यांच्या हस्ते पुण्यात प्रकाशन झाले. प्रकाशन सोहळ्यात उपस्थित – विनोद शिरसाट, चंद्रकांत भोंजाळ, भारत सासणे, डॉ. राजा दीक्षित, डॉ. प्रदीप कर्णिक.