मुक्तेश्वरकृत महाभारताच्या आदिपर्वाचा पहिला खंड १९५१ साली प्रकाशित करून मंडळाने प्रकाशन कार्याला सुरुवात केली. सुमारे १०० च्या वर छोटे-मोठे ग्रंथ मंडळाने वेळोवेळी प्रकाशित केले.
- कोश वाङ्मय
- सूची वाङ्मय
- भाषा, व्याकरण, लिपी, शैली, शिलालेख, मुद्रण :
- ‘कै. सर गोविंद दीनानाथ माडगावकर विश्वस्त संस्थे’ने मराठी संशोधन मंडळाकडे देणगी दिली. त्या देणगीतून जे पहिले पुस्तक मंडळाने काढले ते ‘महाराष्ट्र भाषेचे व्याकरण’. हे १८२४मधले पुस्तक जगन्नाथशास्त्री क्रमवंत, गंगाधरशास्त्री फडके आणि बाळशास्त्री घगवे यांनी हे व्याकरण रचले होते. १९५४ साली मंडळाने ते पुर्नमुद्रित केले. प्रियोळकरांच्या प्रस्तावनेसह आणि सुनीतिकुमार चॅटर्जी यांच्या पुरस्कारासह हे प्रकाशित झाले आहे. जुने व्याकरण म्हणून याचे महत्त्व मोठे आहे.
- १८५० साली मेजर कँडीने ‘विरामचिन्हांची परिभाषा’ नावाची पुस्तिका लिहिली होती. त्याचे पुनर्मुद्रण मंडळाने केले. देवनागरी लिपीविषयी संशोधनात्मक दोन पुस्तिका मंडळाने प्रकाशित करून लिपी संशोधनाला चालना दिली. त्यांपैकी ‘देवनागिरीची ध्वनिलिपी’ ही पुस्तिका स्वतः प्रियोळकरांनीच लिहिली. ल. श्री. वाकणकर यांची ‘देवनागरी लिपी : उगम व विकास’ ही पुस्तिका काढल्यावर कृ. रा. परांजपे यांची ‘देवनागिरी लिपीची घडण’ ही पुस्तिका मंडळाने १९६८ साली प्रकाशित केली. याच लेखकाचे आणखी एक पुस्तक १९८७ साली मंडळाने काढले. ‘भारतीय लिप्यांची तात्त्विक एकात्मता’ या पुस्तकाद्वारा सर्व भारतीय लिप्यांमधील सारखेपणा नमूद करून एका लिपीचा प्रयत्न कसा शक्य आहे याचे विवेचन करण्यात आले आहे.
- व्याकरण विषयक आणखी दोन पुस्तकांचा उल्लेख आवश्यक ठरतो. हेमचंद्राच्या अपभ्रंश व्याकरणाचा अनुवाद के. वा. आपटे यांनी संपादित केला व १९६३ साली मंडळाने तो प्रकाशित केला. कै. आनंद रामकृष्ण नाडकर्णी यांनी ‘ज्ञानेश्वरीतील व्याकरण – विशेष’ कोंकणी बोलीच्या अंगाने विशद केले. ही पुस्तिका १९८१ साली प्रकाशित करण्यात आली.
- ‘साहित्याभ्यासाची शैलीलक्ष्यी पद्धत’ ही पुस्तिका स. गं. मालशे व मिलिंद मालशे या पितापुत्रांनी एकत्र लिहिली. ती १९८१ साली मंडळाने प्रकाशित केली. ‘मराठी भाषेची उत्पत्ती’ (वैद्य-गुणे वाद) ही पुस्तिकाही मंडळाने प्रकाशित केली.
- शिलालेखांच्या संदर्भातही काही पुस्तिका मंडळाने प्रकाशित केल्या आहेत. ‘प्राचीन कोरीव मराठी लेख’ (अ. का. प्रियोळकर, १९६२), ‘मराठी शिलालेख नवे पाठ’ (मो. गं. दीक्षित, १९६३) या दोन पुस्तिका शिलालेखाच्या संशोधनाबाबत आहेत.
- बोली भाषा : मंडळाचा जास्त भर गोमंतकीय, ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या मराठी बोलीवर जरी असला तरी ग्रियर्सन यांच्या कार्याचे महत्त्वही मंडळला कळले होते. ग्रियर्सनच्या Linguistic Survey of India या बहुखंडात्मक कोशातील सातव्या खंडात जे मराठी बोलीचे नमुने आहेत, ते सर्वसामान्य अभ्यासकांसाठी मंडळाने पुस्तिकेच्या रूपाने उपलब्ध करून दिले. ग्रियर्सनचे खंड तसे सहज उपलब्ध नसल्याने ही सोय महत्त्वाची ठरते. ‘अहिर व अहिराणी लोक’ ही अहिराणी बोली भाषेतली वि. गो. पांड्ये यांची पुस्तिका मंडळाने १९६३ साली प्रकाशित करून मराठीच्या एका बोली भाषेतील साहित्य उपलब्ध करून दिले. मराठीच्या बोलींचे नमुने गोळा करण्यासाठी मंडळाने त्या काळी टेपरेकॉर्डरही घेतला होता. या पद्धतीने किती नमुने गोळा केले याचा तपशील मात्र उपलब्ध नाही.
- गोमंतकीय ख्रिस्ती मिशनरींचे मराठी वाङ्मय : प्रा. प्रियोळकरांनी या विषयाला विशेष महत्त्व दिले. या विषयात अनेक पुस्तके प्रकाशित केली. कवी पाद्री मान्युयेल ज्याकिस द् नोरोज यांचे ‘क्रिस्ताचे यातनागीत’ (१९५९), ‘सांतु आंतोनिची आचार्या’, ‘क्रिस्तांची सास्त्राजा काथेशिझ्यु’ हे उत्तर कोंकणी मराठी बोलीचे ग्रंथ मीना जोशी यांनी संपादित केल होते. ‘सांतु आंतोनिची जीवित्व कथा’, ‘फा. स्टीफन्स आणि त्यांचे क्रिस्त पुराण,’ ‘फ्रेंच कवीने लिहिलेले मराठी पुराण’, ‘क्रिस्ताच्या वधस्तंभारोहण प्रसंगीचे विलाप’, अशी काही पुस्तके प्रकाशित केली. मिशनऱ्यांचे मराठी वाङ्मय उजेडात आणण्याचे मोठे कार्य प्रियोळकरांनी केले आहे. यापैकी ‘सांतु आंतोनीची जीवित्व कथा’ हा ग्रंथ मुंबई विद्यापीठाने १९५८च्या पदवी परीक्षेला नेमला होता.
- लोकसाहित्य : पत्रिकेमध्ये या विषयाला स्थान मिळाले असले तरी स्वतंत्र पुस्तकरूपाने एकच पुस्तिका उपलब्ध आहे. प्रा. म. वा. धोंड यांनी ‘कलगी-तुरा’ यावर एक पुस्तिका लिहिली आहे.
- प्राचीन मराठी वाङ्मय : यात मुक्तेश्वर, ज्ञानेश्वर, तुकाराम, मोरोपंत, महानुभाव संप्रदाय आणि इतर लहानसहान प्राचीन कवितांचे संपादन, संशोधन मंडळाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले आहे. त्यांपैकी मुक्तेश्वर, मोरोपंत यांचे दाखले मागे बघितलेच आहेत. यातील सर्वच पुस्तकांचा विचार करणे इष्ट ठरेल.
- ‘अमृतानंदविरचित योगराज टिळक’ हा दत्तसांप्रदायिक ग्रंथ १९५६ साली मंडळाने प्रकाशित केला. मुंबई विद्यापीठाने १९५९ च्या एम.ए.च्या परीक्षेला हा ग्रंथ नेमून त्याचे महत्त्व मान्य केले.
- ‘श्री चक्रधरनिरूपित श्रीकृष्णचरित्र’ हा ग्रंथ महंत गोपीराज महानुभाव यांनी संशोधन करून तयार केला आणि १९५९ साली प्रियोळकरांच्या पुरस्कारासह मंडळाने प्रकाशित केला.
- ‘महीपतीनाथ ढोली बुवा (ग्वाल्हेरकर) यांची पदे’ बा.ना. मुंडी यांनी संपादित केली. ‘दासोपंत विरचित दत्तमाहात्म्य’, ‘श्री दामोदर पंडितविरचित चौपद्या’, ‘श्री-रुद्रेश्वर माहात्म्य’, ‘ज्ञानेश्वरी काव्यपंथ’, ‘ज्ञानेश्वरांचा नाथपंथ’ (पुनर्मुद्रण), अशी काही प्राचीन वाङ्मयातली महत्त्वाची कविता व त्यावरचे भाष्य मंडळाने आवर्जून प्रसिद्ध केले.
- दुर्मिळ ग्रंथ व त्यावरील संशोधन : ‘यदुमणिककृत गणेशपुराण संजीविनी टीका’ हा अज्ञात मराठी गाणपत्य ग्रंथ प्रियोळकरांनी संपादित करून १९५९ साली प्रकाशित केला. ‘ताडपत्रावरील मराठी ग्रंथ कलानिधी’ हा ग्रंथ १९६६ साली काढला. नॅशनल लायब्ररीत हस्तलिखित रूपात उपलब्ध असलेला महात्मा फुले महात्मा फुले यांचा ‘शेतकऱ्याच्या आसूड’ हा ग्रंथ हे मंडळाचे महत्त्वाचे संशोधन व प्रकाशन आहे. आगरकरांनी भाषांतरित केलेले ‘शेठ माधवदास रघुनाथदास यांचे आत्मलिखित पुनर्विवाह चरित्र’ मंडळाने पुन्हा छापून उपलब्ध करून दिले, तर न्या. महादेव गोविंद रानडे यांचे ‘मराठी वाङ्मयाची अभिवृद्धी : एक टिपण’ ही पुस्तिकाही पुन्हा उपलब्ध करून दिली.
- पीएच्. डी. प्रबंध : प्रियोळकरांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंधलेखन पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी तिघांचे प्रबंध पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यात आले. ‘युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा’ (श्री. म. पिंगे), ‘आधुनिक मराठी गद्याची उत्क्रांती’ (कृ. भि. कुलकर्णी), ‘सतराव्या शतकातील गोमंतकी बोली’ (वि. बा. प्रभुदेसाई) हे तीन ग्रंथ वाङ्मयाच्या इतिहासाच्या अभ्यासाला अत्यंत उपयक्त आहेत. यातील डॉ. वि. बा. प्रभदेसाई यांच्या ग्रंथाला ‘टीका व भाषाशास्त्र’ अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारचे पारितोषिक मिळून मंडळाचा सन्मान झाला.
- १९ व्या शतकातले वाङ्मय : प्राचीन वाङ्मयाबरोबरच मंडळाने एकोणिसाव्या शतकाकडेही लक्ष वेधले. ‘प्रो. केरूनाना छत्रे यांची टिपणवही’, गोविंद नारायण माडगावकर यांचे संकलित वाङ्मय’ ही प्रियोळकरांच्या काळात प्रसिद्ध झालेली काही पुस्तके. डॉ. मालशे, प्रा. धोंड यांच्या कालखंडात या विषयाला अधिक महत्त्व मिळाले. ‘केशवसुतांच्या कवितांचे हस्तलिखित’, ‘सतारीचे बोल’, ‘सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता’, ‘डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे वाङ्मयविषयक लेख’, ‘विष्णुबाबा ब्रह्मचारी यांचे राजनीतिविषयक लेख’, ‘लोकहितवादींची हिंदुस्थानच्या दारिद्र्याची चिकित्सा व दादाभाई नौरोजी’, अशा काही पुस्तिका मंडळाने प्रकाशित केल्या. त्यांना सामाजिक तसेच वाङ्मयीन महत्त्व होते.
- संशोधन पत्रिकेतील लेख-संग्रह : मराठी संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेले लेख, जे स्वतंत्र पुस्तिकेच्या रूपाने निघालेले नाहीत, अशा लेखांचे संग्रह ‘मराठी संशोधन’ या नावाने मंडळाने प्रकाशित केले आहेत. पत्रिका ज्यांच्यापाशी नाही, अशा अभ्यासकांची सोय व्हावी म्हणून ही व्यवस्था करण्यात आली होती.
- संकीर्ण : याव्यतिरिक्त काही पुस्तके आहेत. त्यांपैकी ‘प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या डायऱ्यांतील टिपणे’ हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी नियतकालिकांचा अभ्यास करताना वा. लं. नी. जी टिपणे काढली होती त्याचे हे पुस्तक आहे. यात वा.लं.च्या हस्ताक्षरातच हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. नियतकालिकांच्या संदर्भातील वा. लं. ची निरीक्षणे अभ्यासकांना उपयुक्त ठरतील असे याचे स्वरूप आहे. ‘प्रबंध, धृपद आणि ख्याल’ ही म. वा. धोंडांची पुस्तिका, ‘आधुनिक मराठी संहिता चिकित्सा’, ‘राम गणेश गडकरी यांनी निवडलेले श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या चार नाटकांतील सुंदर उतारे’, अशा काही पुस्तिकांचा यात समावेश होतो.
प्रकाशनाद्वारा वाङ्मय उपलब्ध करून देणे आणि केवळ पुस्तके प्रकाशित न करता त्याबरोबरचे संशोधनही करणे, मग त्याचे प्रकाशन करणे, ही क्रिया मंडळाने महत्त्वाची मानली. प्रामुख्याने ज्या विषयांना सर्वसाधारण प्रकाशक हात घालणार नाहीत असे विषय निवडून मराठी वाङ्मयासाठी ते ग्रंथ सिद्ध करणे ही गोष्ट विशेष आहे.