१९५३ साली मंडळाने संशोधनाला वाहिलेले त्रैमासिक मराठी संशोधन मंडळाने सुरू केले. साधारणपणे मंडळाचे संचालक हे पत्रिकेचे संपादकीय कार्य पाहतात. मराठी भाषा व वाङ्मय यांच्या संशोधनाला वाहिलेले हे प्रमुख त्रैमासिक आहे. यात प्रामुख्याने प्राचीन अप्रकाशित ग्रंथ, संशोधनपर विवेचक व विश्लेषणात्मक लेख, संशोधनाला उपयुक्त अशी साधने, व्यक्तीचे कार्य इत्यादींचा समावेश आहे. ही पत्रिका ७० वर्षे अव्याहतपणे (काही वर्षांचे अपवाद वगळता) चालू आहे.
संस्थापक : कै. प्रा. अ. का. प्रियोळकर
संपादक : डॉ. नितीन रिंढे
पत्रिकेत तीन प्रकारांनी साहित्य छापले जाते.
- स्वतंत्र पृष्ठांकांचे साहित्य
- स्वतंत्र पृष्ठांकांचे क्रमशः साहित्य
- अन्य लेख
असे करण्याचे कारण असे की पुढे या स्वतंत्र पृष्ठांकाच्या मजकुराची जादा पाने छापून (Off prints) त्यातून पुस्तके सिद्ध करता यावीत आणि मंडळाचा प्रकाशनावरचा आर्थिक बोजा कमी व्हावा. पत्रिकेचा पहिला अंक ऑक्टो. ते डिसेंबर असतो तर चौथा अंक जुलै ते सप्टेंबर असतो. गेल्या ५० वर्षांच्या पत्रिकेचा आढावा घेणे हा स्वतंत्र संशोधनाचा विषय असला तरी त्यात आलेल्या काही महत्त्वाच्या विषयांची दखल घेणे शक्य आहे.
‘विठ्ठल’ या विषयावर रा. चिं. ढेरे व इतर संशोधकांनी लेखन केले आहे. ज्ञानदेव व ज्ञानदेव वाङ्मयावर भरपूर लेखन झाले आहे. याचप्रमाणे नामदेव, एकनाथ, तुकाराम, मुक्तेश्वर, महानुभाव अशा प्राचीन वाङ्मयावरचे अनेक लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
शिलालेख, प्राचीन मराठी गद्य, बखरी, लोकसाहित्य, शाहिरी वाङ्मय यांनाही स्थान लाभलेले आहे.
भाषा, बोली, व्याकरण, लिपी, अनुवाद, मुद्रण यांवरचे असंख्य लेख पत्रिकेने प्रकाशित केले आहेत. संशोधन पद्धती. साधने. संहिताचिकित्सा. हस्तलिखिते आणि त्यांचे संशोधन संरक्षण संपादन इत्यादी विषयांनाही खास जागा देण्यात आली आहे. सूचिविषयक अनेक लेख आणि प्रत्यक्ष विविध प्रकारच्या सूची प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
काही व्यक्तींच्या संदर्भात लेख प्रसिद्ध झाले आहेत. उदा. नाटककार शहाजी राजे, अज्ञात कवि हरिदास, कॅरे आणि फोर्ट विल्यम कॉलेज, संत देवदास, महाराष्ट्र कवी व्यंकट, लावणीकार ज्योतिराम, इत्यादी.
काही संकीर्ण विषयही हाताळले आहेत. निबंधमालेतला पत्रव्यवहार, म. फुले यांनी हंटर कमिशनपुढे सादर केलेले निवेदन, रे. ना. वा. टिळकांचे एक पत्रक, ज्ञानप्रकाश : प्रकाशनपूर्व प्रकटन, इत्यादी प्रकारचेही अनेक लेख आहेत.
याबरोबच पत्रिकेचे खास विशेषांकही आहेत. मुक्तेश्वर, लोकसाहित्य, ज्ञानेश्वर, रौप्यमहोत्सव अंक इत्यादी.
संशोधन पत्रिकेच्या माध्यमातून मंडळाने संशोधनाचे कार्य पुढे तर नेलेच, परंतु मराठी भाषा व वाङ्मयातील संशोधनाला दिशा दिली. पत्रिकेच्या रूपाने संशोधकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.